अभंग १ ते४१ ॐ कार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन

 


स्वामी स्वरूपानंद  लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘


अध्याय १ ला -

अभंग १ ते४१ ॐ कार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन

********

आत्मरुपा तुज । करीं नमस्कार । तुझा जयजयकार । असो देवा ॥१॥

ॐकारस्वरुपा । तूं चि सर्वा मूळ । व्यापोनि सकळ । राहिलासी ॥२॥

सर्व सर्वातीत । तूं चि सर्वात्मक । विषय तूं एक । वेदांलागीं ॥३॥

‘नेति नेति’ ऐसें । बोलती ते वेद । स्वरुप अगाध । तुझें देवा ॥४॥

जाणावयाजोगा । आपणा आपण । म्हणोनियां मौन । वेदांसी हि ॥५॥

आत्मरुपा देवा । तूं चि गणाधीश । बुद्धीचा प्रकाश । सकलांच्या ॥६॥

आतां ऐका ऐसें । म्हणे श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ज्ञानदेव ॥७॥

पूर्ण शब्दब्रह्म । गणेशासी मूर्ति । सजलीसे किती । मनोरम ॥८॥

वर्णरुप शोभे । शरीर निर्मळ । सौंदर्य सोज्ज्वळ । खुले तेथें ॥९॥

कैसी रसपूर्ण । देहाची ठेवण । प्रकटली खाण । लावण्याची ॥१०॥

वेगळाल्या स्मृती । ते चि अवयव । सौंदर्याची ठेव । अर्थ-शोभा ॥११॥

अठरा पुराणें । शोभती साचार । जणूं अलंकार । रत्नमय ॥१२॥

वेंचोनियां नाना । प्रमेयांचे मणी । पद्याचे कोंदणीं । बैसविलें ॥१३॥

सहज सुंदर । शब्दांची रचना । वस्त्र तें चि जाणा । रंगदार ॥१४॥

साहित्याचा धागा । नाजूक अत्यंत । दिसे ओतप्रोत । झळाळत ॥१५॥

काव्य-नाटकें तीं । जणूं घाग-याच । ऐसें वाटे साच । निर्धारितां ॥१६॥

आणि अर्थ-ध्वनि । करी रुणझुण । हालतां चरण । गणेशाचे ॥१७॥

नाना प्रमेयांची । चातुर्ये गुंफण । करोनि पैंजण । घडिलासे ॥१८॥

योग्य पदें हींच । तेथ रत्नें भलीं । जरी विलोकिलीं । सूक्ष्मदृष्टी ॥१९॥

व्यासादिक कवि- । श्रेष्ठांची जी मति । तो चि शेला कटीं । शोभतसे ॥२०॥

नितांत निर्मळ । तयाचे पदर । झळकती सुंदर । अग्रभागीं ॥२१॥

सहा शास्त्रें तीच । भुजांची आकृति । वेगळाले देती । अभिप्राय ॥२२॥

म्हणोनिया हातीं । आयुधें हि भिन्न । दाखवाया खूण । आपुलाली ॥२३॥

तर्क तो परश । न्याय तो अंकुश । मोदक सुरस । वेदात्नाचा ॥२४॥

बौद्ध-वार्तिकांचें । जें का बौद्धमत । तो चि छिन्न दंत । योगाहातीं ॥२५॥

मग सांख्यमत । तो चि पद्महस्त । स्वभावें जो देत । वर-दान ॥२६॥

धर्मसूत्रें जीं का । धर्मसिद्धिप्रद । तो चि येथें सिद्ध । अभयहस्त ॥२७॥

निर्मळ विवेक । सरळ ती सोंड । जेथें महानंद । स्व-सुखाचा ॥२८॥

संवाद तो दंत । दुजा शोभे संगें । समत्वाच्या योगें । शुभ्रवर्ण ॥२९॥

ज्ञानरुप भले । पहा सूक्ष्म डोळे । शोभती आगळे । विघ्नेशाचे ॥३०॥

दोन हि मीमांसा । ते चि दोन्ही कान । ऐसें माझें मन । सांगे मज ॥३१॥

गंडस्थलांतून । स्वभावें संतत । बोधमदामृत । पाझरे जें ॥३२॥

तेथें मुनिजन । होवोनि भ्रमर । जाहले अमर । सेवितां तें ॥३३॥

मर्ते द्वैताद्वैत । पावती ऐक्यातें । तुल्यबलें तेथें । गंडस्थलीं ॥३४॥

नाना तत्त्वार्थाचीं । सतेज पोंवळीं । कैसीं विराजलीं । गजाननीं ॥३५॥

दशोपनिषदें । पुष्पें सुगंधित । नित्य उधळीत । ज्ञान-रेणू॥३६॥

सहज सुंदर । मनोरम अति । शोभती मुकुटीं । पहा कैसीं ॥३७॥

अकार पाउलें । उकार उदर । दिसे मनोहर । विशालत्वें ॥३८॥

मकार तो महा-। मंडलासारिखा। आकार आलेखा । मस्तकाचा ॥३९॥

अ उ म हे तिन्ही । होतां एकवट । ॐकार प्रकट । दिसू लागे ॥४०॥

गुरुकृपें आदि- । बीज तें वंदिलें । जेथ सामावलें । शब्द-ब्रह्म ॥४१॥

"******

Comments

Popular posts from this blog

अध्याय १ ला - अभंग .अर्जुन विषाद ३३३ ते ३८९************

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५०गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता.

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग .२०३ ते २७६ दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन ****************