स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग १११ते१५० ज्ञानदेवांची विनम्रता

ज्ञानदेवांची विनम्रता
*****::::::
तुमचें हृदय । सखोल म्हणोनि । पायीं विनवणी । सलगीची ही ॥१११॥
ऐकोनियां जैसा । बालकाचा बोल । प्रेमें येई डोल । मायबापां ॥११२॥
तैसा तुम्हीं मातें । आपुला लेखिला । अंगीकार केला । संतजनीं ॥११३॥
म्हणोनि जें उणें । साहाल तें सुखें । कासया हें मुखें । विनवावें ॥११४॥
परी आगळीक । आणिक ती येथ । पाहें मी गीतार्थ । कवळाया ॥११५॥
ऐका प्रभो तुम्हां । संत श्रोते जनां । करितों प्रार्थना । ह्या चि लागीं ॥११६॥
हें तों अनावर । न झाला विचार । वायां चि हा धीर । केला येथें ॥११७॥
नाहीं तरी देखा । प्रकाशतां सूर्य । काजव्याची काय । शोभा तेथें ॥११८॥
किंवा र्चोचीनें च । अब्धि आटवाया । प्रवर्तली वायां । टिटवी जैसी ॥११९॥
नेणता मी तैसा । असोनि सर्वथा । सांगाया गीतार्था । सिद्ध झालों ॥१२०॥
ऐका आकाशातें । कवळूं पहावें । तरी मोठें व्हावें । त्याहुनी हि ॥१२१॥
म्हणोनि हें माझ्या । योग्यतेबाहेर । आघवें साचार । पाहूं जातां ॥१२२॥
अहो गीतार्थाचें । काय थोरपण । स्वयें विवरुन । दावी शंभु ॥१२३॥
जेथ ती भवानी । पावोनि आश्चर्य । विचारितां काय । बोले तिज ॥१२४॥
देवी तुझें रुप । नाकळे गे जैसें । नित्य नवें तैसें । गीता-तत्त्व ॥१२५॥
योगनिद्रेमाजीं । जयाचा कीं घोर । वेदार्थ-सागर । रुप झाला ॥१२६॥
तो चि सर्वेश्वर । बोलिला प्रत्यक्ष । तत्त्व हें अलक्ष्य । अर्जुनाशीं ॥१२७॥
ऐसें जें गहन । वेदां जेथें मौन । तेथें मी अजाण । काय बोलूं? ॥१२८॥
अपार हें सार । कैसें आकळावें । कोणें धवळावें । भानु-तेज ॥१२९॥
मशकानें कैसा । आकाशाचा प्रांत । धरावा मुठींत । सांगा बरें ॥१३०॥
परी मज येथं । आधार तो एक । म्हणोनि निःशंक । बोलतसें ॥१३१॥
ज्ञानदेव म्हणे । माझा पाठीराखा । निवृत्ति तो देखा । गुरुराव ॥१३२॥
एर्‍हवीं मी एक । अज्ञान बालक । झाला अविवेक । जरी येथें ॥१३३॥
तरी संतकृपा-। दीपक सोज्ज्वळ । तेणें चि सबळ । केलों आतां ॥१३४॥
अहो लोहाचें हि । होतसे सुवर्ण ।सामर्थ्य तें पूर्ण । परिसाचें ॥१३५॥
किंवा मृतातें हि । लाभे सजीवता । तया मुखीं जातां । अमृत तें ॥१३६॥
जरी का वाग्देवी । सरस्वती भेटे । तरी वाचा फुटे । मुक्यातें हि ॥१३७॥
वस्तुसामर्थ्याचें । बळ हें केवळ । नसे हो नवल । येथें कांहीं ॥१३८॥
जयातें लाभली । कामधेनु माता । सर्व कांहीं हाता । येई त्याच्या ॥१३९॥
तैसा श्रीसमर्थ । म्हणोनि हा ग्रंथ । रचावया हात । घातला मीं ॥१४०॥
तरी श्रोतेजन । येथें जें जें न्यून । तें तें घ्यावें पूर्ण । करोनियां ॥१४१॥
आणि जें अधिक । घ्यावें तें मानोनि । ऐसी विनवणी । माझी तुम्हां ॥१४२॥
बाहुली ती नाचे । जैसी सूत्राधीन । तैसा मी बोलेन । बोलविल्या ॥१४३॥
द्यावें अवधान । अहो संतजन । व्हावें कृपापूर्ण । मजवरी ॥१४४॥
साधूंचा अंकित । निरोप्या मी दूत । मज ते नटवोत । निजेच्छेनें ॥१४५॥
होवोनि प्रसन्न । तंव गुरुदेव । म्हणती प्रस्ताव । पुरे आतां ॥१४६॥
हें तों सर्व कांहीं । आम्हालागीं ठावें । न लगे बोलावें । ज्ञानदेवा ॥१४७॥
आम्ही तुजलागीं । दिलें वरदान । गीतार्थ-व्याख्यान । करी त्वरें ॥१४८॥
श्रीगुरु-वचन । ऐकोनि सादर । आनंद-निर्भर । होवोनियां ॥१४९॥
म्हणे श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ऐका सावकाश । कथाभाग ॥१५०॥

Comments

Popular posts from this blog

अध्याय १ ला - अभंग .अर्जुन विषाद ३३३ ते ३८९************

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५०गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता.

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग .२०३ ते २७६ दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन ****************