स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ५५ते८६ महाभारतकथा स्तुति


महाभारतकथा स्तुति
*****
आतां सावधान । ऐका श्रोतेजन । कथा जी गहन । भारताची ॥५५॥
विवेक-वृक्षांचे । अपूर्व उद्यान । कौतुकांची खाण । सकल हि ॥५६॥
सर्व सुखांचे जी । असे जन्म-स्थान । कीं महा-निधान । प्रमेयांचें ॥५७॥
नऊ हि रसांचा । परिपूर्ण देखा । सुधा-सिंधु जी का । रसाळत्वें ॥५८॥
सर्व विद्यांचें जी । असे मूळस्थान । मोक्षाचें निधान । प्रकटलें ॥५९॥
किंवा जी का सर्व । शास्त्रांची आधार । धर्माचें माहेर । सकलहि ॥६०॥
शारदेच्या शोभा- । रत्नांचे भांडार । नातरी जिव्हार । सज्जनांचें ॥६१॥
किंवा महाबुद्धी । माजीं व्यासांचिया । देखा स्फुरोनियां । सरस्वती ॥६२॥
त्रिलोकामाझारीं । जाहली प्रकट । ऐशा सर्वश्रेष्ठ । कथारुपें ॥६३॥
काव्यराज नांव । म्हणोनि ह्या ग्रंथा । रसां रसाळता । येथोनी च ॥६४॥
पावली शब्दश्रे । येथें सत्‍-शास्त्रता । वाढली मृदुता । महा-बोधीं ॥६५॥
चातुर्य तें येथें । शाहणें जाहलें । प्रमेय नटलें । गोडपणें ॥६६॥
सुखाचें सौभाग्य । पोसलें ह्या ठायीं । थोरपणा येई । उचितासी ॥६७॥
येथें माधुरीसी । आली मधुरता । तेविं सुरेखता । शृंगारासी ॥६८॥
कलेसी कौशल्य । प्राप्त झालें भलें । पुण्या तेज आलें । आगळें चि ॥६९॥
जनमेजयाचे । म्हणोनि निःशेष । हारपले दोष । अनायासें ॥७०॥
पाहतां क्षणैक । रंगासी आगळें । तेज तें चढलें । सुरंगाचें ॥७१॥
तेविं येथोनी च । थोर भलेपणा । लाधलासे जाणा । सद्‌गुणांसी ॥७२॥
उजळे त्रैलोक्य । सूर्य-प्रकाशांत । व्यास-मति-व्याप्त । विश्व तैसें ॥७३॥
चोखाळोनि भूमि । पेरियलें बीज । विस्तारें सहज । जैशा रीती ॥७४॥
यथारुचि तैसे । स्वभावें सर्वार्थ । झाले प्रफुल्लित । भारतीं ह्या ॥७५॥
किंवा नगरांत । रहावया जावें । मग सभ्य व्हावें । जिया परी ॥७६॥
तैसें व्यासोक्तीचें । तेज प्रकटलें । तेणें उजळलें । सर्व कांहीं ॥७७॥
तारुण्यीं बहर । दिसे आगळाच । स्त्रियांअंगीं साच । सौंदर्याचा ॥७८॥
ना तरी वसंतीं । प्रकटतें ठेव । उद्यानीं अपूर्व । वनश्रीची ॥७९॥
नाना अलंकारीं । नटोनि सुवर्ण । दावी बरवेपण । आगळें चि ॥८०॥
तैसें व्यासोक्तीनें । होतां अलंकृत । होय शोभा प्राप्त । कोणातें हि ॥८१॥
म्हणोनिया वाटे । इतिहासें काय । घेतला आश्रय । भारताचा! ॥८२॥
प्रतिष्ठा संपूर्ण । लाभावी म्हणोन । अंगीं लीनपण । धरोनियां ॥८३॥
अठरा हि पुराणें । आख्यानांचे द्वारा । येथें आलीं घरा । भारताच्या ॥८४॥
देखा जें जें महा- । भारतीं नाढळे । शोधितां न मिळे । त्रैलोक्यीं तें ॥८५॥
म्हणोनियां ऐसें । बोलती यथार्थ । असे व्यासोच्छिष्ट । जगत्रय ॥८६॥
*******

Comments

Popular posts from this blog

अध्याय १ ला - अभंग .अर्जुन विषाद ३३३ ते ३८९************

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५०गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता.

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग .२०३ ते २७६ दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन ****************